व्यावसायिक गॅस सिलिंडर १०२ रुपयांनी महागला

नवी दिल्ली : महागाईच्या चटक्याने होरपळत असलेल्या जनतेवर आता गॅस सिलिंडर दरवाढीचा बोजा आणखी वाढणार आहे. आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २६८.५० रुपये वाढ करण्यात आली होती. आता या महिन्यात पुन्हा १०२ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राजधानी दिल्लीत १९ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी २३५५.५० रुपये मोजावे लागतील. ३० एप्रिलपर्यंत त्याची किंमत २२५३ रुपये होती. त्याचबरोबर कोलकातामध्ये पूर्वी २३५१ रुपयांत व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत होते, आता त्यासाठी २४५५ रुपये खर्च करावे लागतील. मुंबईत आजपासून २२०५ रुपयांऐवजी २३०७ रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २४०६ रुपयांवरून २५०८ रुपयांपर्यंत वाढले आहेत.

व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने बाहेर खाणे आणखी महाग होण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा परिणाम हॉटेल, खाद्य पदार्थाचे स्टॉल, केटरिंगच्या दरावर होण्याची शक्यता आहे.

घरगुती ग्राहकांना दिलासा
गॅस कंपन्यांनी घरगुती गॅस ग्राहकांना या महिन्यात दिलासा आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. मुंबईत विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ९४९.५० रुपये आहे, तर दिल्लीत विना अनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरचे दर ९४९.५० रुपये झाले आहेत, तर कोलकात्यात गॅस सिलिंडरचे दर ९७६ रुपये आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा सर्वाधिक दर बिहारची राजधानी पाटणामध्ये आहे. पाटणामध्ये १०३९.५० रुपये इतका दर आहे.

सीएनजी गॅसही महागला
पेट्रोल, डिझेल दरवाढीने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे पुन्हा एकदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो मागे ४ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरात सीएनजी गॅससाठी प्रति किलोसाठी ७६ रुपये मोजावे लागणार आहेत. महानगर गॅस लिमिटेड हा मुंबई, ठाणे आणि परिसरात प्रमुख गॅस वितरक आहे. ही दरवाढ शनिवारपासून लागू झाली आहे.

Share