मास्कसक्ती नाही; पण सर्वांनी मास्क वापरावा : राजेश टोपे

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना आज सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. मास्कसक्तीचा निर्णय राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही; परंतु संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना (कोविड-१९) संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याशिवाय आषाढी वारीसंदर्भातसुद्धा चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही नेहमीच कोविडबाबत अतिशय सविस्तर माहिती सादर करत असतो, त्याप्रमाणे आजदेखील अशी माहिती सादर करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. काही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५, ६, ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी असल्याचे टोपे म्हणाले.

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हीटी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना आज देण्यात आलेल्या आहेत. काल रविवार असल्याने तपासण्या कमी झाल्या; परंतु आजपासून हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० पैकी चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. या ठिकाणी रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण १ टक्का आहे. सुदैवाने रुग्णांची प्रकृती गंभीर नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. तसा निर्णय झालेला नाही; पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावा. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्कबाबत आम्ही सगळ्यांना सांगितले आहे की, मास्क वापरण्याची जरी सक्ती नसली तरी सगळ्यांना मास्क वापराबाबत आवाहन केलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. मात्र, लोकांनी स्वेच्छेने मास्क घालावा, असेही टोपे यांनी सांगितले.

Share