अमरावती : शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. मी त्या दिवशी ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसाचे पठण करेन, असे आव्हान देत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत.
बडनेराचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’ निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन केले होते. ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण न केल्यास ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी शिवसैनिकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी परिवहनमंत्री अनिल परब, युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर येऊनच दाखवावे. ते परत कसे जातात, हे आम्ही पाहतो, ‘ असे आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिले.
दरम्यान, आज शनिवारी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यातर्फे हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यात आले. यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. खा. नवनीत राणा म्हणाल्या, मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी मला वेळ आणि जागा सांगावी. तेव्हा तेथे येऊन मी हनुमान चालिसाचे पठण करेन. संकटमोचक हनुमानही माझ्या पाठीशी आहे.
…तर ‘मातोश्री’ रावणाची लंका होईल
आ. रवी राणा यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मी आज हनुमानाची पूजा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. उद्धव ठाकरे हे दिशाहीन झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्याला साडेसाती लागली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी माझ्याविरोधात आक्रमक होण्यापेक्षा ‘मातोश्री’च्या आत जाऊन हनुमान चालिसा पठण करावे. जेणेकरून राज्याला लागलेली साडेसाती आणि संकट दूर होईल. माझ्या पाठीशी राम आणि हनुमानाचा आशीर्वाद आहे. तुम्ही कितीही ताकद लावली तरीही मी ‘मातोश्री’वर आल्यास मला कोणीही अडवू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा वाचली नाही तर ‘मातोश्री’ रावणाची लंका होईल. रामाच्या विचारांचे राज्य हवे असेल आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे रवि राणा म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या भल्यासाठी हनुमान चालिसा वाचणे गरजेचे आहे, असे आ. रवी राणा यांनी सांगितले.