देशात विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावतोय : शरद पवार

उदगीर : आज-काल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. अशा प्रकारची प्रपोगंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देत असून, अराजकता ओढवण्यास कारणीभूत ठरत आहे. आपल्या देशात विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावताना दिसत आहे. त्यामुळे साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. २२, २३ आणि २४ एप्रिल असे तीन दिवस हे संमेलन होत आहे. उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे, माजी केंद्रीय मंत्री व राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उद्योग व मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, बसवराज पाटील नागराळकर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आ. विक्रम काळे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीत रसाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली. या विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आले. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरने ‘माईन काम्फ’ पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रपोगंडा (मतप्रचार) हे त्याचे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशातही असा विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावताना दिसत असल्याचे सांगून पवार यांनी या साहित्य संमेलनाच्या मंचावरून अप्रत्यक्षपणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. साहित्य हे मुक्त असावे. याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते. साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे. साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. साहित्य महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी पाच वर्षातून किमान एकदा तरी महिलेची निवड व्हावी अशी तरतूद व्हावी. अशी सूचना पवार यांनी केली.

चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही
पवार म्हणाले की, राज्यकर्ते असा प्रपोगंडा थेट करीत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रपोगंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहेच. कॉर्पोरेटचे छत्र हे प्रपोगंडाचे अस्त्र होऊ पाहते आहे. हे कॉर्पोरेटीकरण साहित्यात झाले, तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही.

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !
पवार म्हणाले, ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याधारे न लिहिता ऐकीव व तार्कीक माहितीधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे.नाहीतर जनमाणसांत त्या चूका मूळ धरू लागतात आणि ठाण मांडून बसतात. अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर !’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा.कयास आणि कल्पनाविलास करण्यासाठी इतर फिक्शनल साहित्य प्रकार आहेत. अशा प्रवृत्तींच्या लेखकांनी त्यासाठी लेखणी पाजळावी.

प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारणार -सुभाष देसाई 
मुंबईत ज्याप्रमाणे मराठी भाषा भवनाची निर्मिती करण्यात येत आहे, त्याचप्रकारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज असे मराठी भाषा भवन उभारले जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी प्रस्ताव सादर करून मंजुरी घेतली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केली. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारले जाईल. सर्व विषयावरील नवी तसेच जुनी मराठी पुस्तके, दालने, संग्रहालय याने ही भवने समृद्ध असतील. सर्वांना या भाषा भवनाचा वापर करून आपली मराठी भाषा समृद्ध करता येईल. मराठी भाषेच्या अभ्यासकांना तसेच सामान्यांनाही अशा भवनांमुळे फायदा होईल. यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध तसेच मराठी भाषेचा प्रचारही होईल, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

उजव्या विचारसरणीवर भारत सासणेंची टीका
संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी आपल्या भाषणात अनेक विषयांना स्पर्श केला. त्यांनी साहित्यिकांना विविध प्रश्नांवर भूमिका घेण्याचे आवाहन करताना उजव्या विचारसरणीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोरोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं; पण ज्यांच्या हाताला रक्त लागलं आहे, किंवा पापाचा स्पर्श झाला आहे ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्या प्रमाणे ‘वॉश माय हँडस्’ असं म्हणतदेखील नाहीत. लेखक हे पाहतो आहे. आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिन’ येतील, असा विश्वास मला वाटतो. वर्तमानाचं भान नसणं हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्वाच्या घटना अलिकडे घडल्या त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे, असा टोकदार सवाल सासणे यांनी उपस्थित केला.

Share