राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेबाबत पोलिस आयुक्तच निर्णय घेतील

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येत्या १ मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला परवानगी देण्याबाबतचा निर्णय औरंगाबादचे पोलिस आयुक्तच घेतील. औरंगाबादचे पोलिस आयुक्त याबाबत त्यांचे सहकारी आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करत आहेत. सगळी परिस्थिती पाहून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. मनसेच्या सभेला परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय एक-दोन दिवसांत घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

राज्यातील मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत हटविण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असून, ते औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी सभा घेणार आहेत. मात्र, या सभेला प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. मनसे नेते मात्र सभा घेण्यावर ठाम आहेत. राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मिळणार की नाही याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना भाष्य केले आहे. “सर्व पक्षांच्या बैठकीत सर्व चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हा औरंगाबाद पोलिस आयुक्तांचा अधिकार आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही, असे वळसे पाटील यांनी म्हटले. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कठोर कारवाई करेल, असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या  निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत पोलिसांकडून हीन वागणूक मिळाली असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. या आरोपाविषयी गृहमंत्री गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,  नवनीत राणा यांच्या आरोपानंतर मी याबाबत माहिती घेतली, मात्र असे काही घडले  नसल्याचे समोर आले आहे. मात्र, तरीही आम्ही पुन्हा चौकशी करू.  लोकसभा सभापतींनी घडलेल्या घटनेविषयी माहिती मागवली आहे. ही माहिती आम्ही लवकरच त्यांना देऊ.

दरम्यान, महाराष्ट्रात पोलिसांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या आरोपावरही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. पोलिस कायद्यानेच कारवाई करतात. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणीही निर्णय घेत नाही. आतापर्यंत झालेली कारवाई कायद्यानेच झाली असून ती योग्य आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

Share