मुंबई : जो कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्या विरोधात पोलिस कारवाई करतील. कारण कायद्यासमोर सगळे जण समान आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली. तसेच राज ठाकरे, राणा दाम्पत्य आणि राणे पिता-पुत्र हे तीन RRR विरोधकांनी चांगलेच जुळवलेले दिसतायत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी भुजबळ यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पिता-पुत्रांना साऊथचा सुपरडुपर हिट चित्रपट RRR ची उपमा दिली. ठाकरे सरकार उत्तम काम करतंय. लोककल्याणकारी निर्णय घेतंय; पण महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने या तीन RRR चा उपयोग सुरू केलाय, असा टोला त्यांनी लगावला.
याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कायद्यासमोर कोणीही मोठा नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत; परंतु कुठेतरी एखाद्या शब्दात ते अडकले आणि त्याबरोबर त्यांना मग अटक व्हावी लागली. राणे झाल्यानंतर मग राणा दाम्पत्य, ते खासदार आणि आमदार आहेत;परंतु न्यायालयानेच जे काही त्यांना फटकारलं की, तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याचा अधिकार कोणी दिला? दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन या सगळ्या गोष्टी करायचा. तुम्ही स्वत: कायदे बनवणारे आहात, तर तुम्ही असं कसं काय करू शकतात. त्यामुळे आपण पाहतोय की, आज दहा-पंधरा दिवस झाले, त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. राणे काय, राणा काय आणि आता राज काय. हे बरोबर RRR असंच जुळलेलं दिसतंय.
इंधन दरवाढ, महागाईविषयी राज ठाकरेंनी बोलायला हवे
भोंगे सोडून देशात इतरही महत्त्वाचे प्रश्न आहेत. खरं तर इंधन दरवाढ, महागाईविषयी राज ठाकरेंनी बोलायला हवे; पण या मुद्द्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करून राज ठाकरे नको त्या मुद्द्यावर बोलतायत, कारण त्यांना याच मूळ मुद्द्यावरुन लक्ष हटवायचं आहे, म्हणूनच महाराष्ट्रातील विविध भागांत सभा घेण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे, असेही भुजबळ म्हणाले.
राजसाहेब, मनाचा कोतेपणा दाखवू नका, दंगे भडकवू नका
ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांवर टीका करण्यासाठी खोटं बोलू नका. उद्धव ठाकरे समर्थपणे राज्याचं नेतृत्व करत आहेत. उत्तमपणे काम करत आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी राजसाहेब आपण मनाचा असा कोतेपणा दाखवू नका, महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करू नका, उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचे काम करू नका, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.