औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) युवा मंचच्या वतीने ‘स्फूर्ती युथ फेस्टिव्हल’चे आयोजन औरंगाबाद येथील श्री अग्रसेन भवन, कॅनॉट प्लेस येथे शनिवारी (७ मे) करण्यात आले होते. या ‘स्फूर्ती युथ फेस्टिव्हल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१५ ते ३५ वर्षांपर्यंतच्या युवकांसाठी आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलमध्ये युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या फेस्टिव्हलमध्ये ‘विक्ट्री- गेम ऑफ लाईफ’ या शॉर्ट स्कीटचे सादरीकरण करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ. श्रीमान जय हनुमान प्रभू यांनी ‘विनिंग द गेम ऑफ लाईफ’ या विषयावर युवकांशी संवाद साधला. बाह्य यशासोबतच आंतरिक दृढता तेवढीच महत्वपूर्ण आहे. यशस्वी जीवनासाठी योग्य ध्येयाने प्रेरित होण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच अनेक समर्पक उदाहरणांवरून युवकांचा आत्मविश्वास वाढविला. शहरातील अनेक प्रसिद्ध युवा उद्योजक तसेच व्यावसायिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते हर्षवर्धन कराड, औरंगाबाद स्मार्ट सिटी मिशनचे आदित्य तिवारी, अनुराग कल्याणी (एनआयपीएम), डॉ. प्रेमप्रद प्रभू, रुक्मिणीरमण प्रभू, डॉ. श्रीकांत जोगदंड, डॉ. युवराज गिरबने, शक्तिकुमार सावंत, डॉ. विशाल लदनिया, आर्किटेक्ट अखिलेश गुप्ता, बळीराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
रात्री झालेल्या ‘म्युझिकल शो’ ने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सर्वांनी फ्री डिनरचा यथेच्छ आस्वाद घेतला. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी १७०० युवकांचे फ्री रजिस्ट्रेशन प्राप्त झाले. त्यातील १००० युवकांना महोत्सवात प्रवेश मिळाला. आता येत्या २४ मे रोजी ‘on the way to success’ या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. त्यासाठी http://iys.iskconaurangabad.in या लिंकवर नि:शुल्क रजिस्ट्रेशन करावे किंवा ९४०४४६९६३३, ७२७६०२६३८४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन इस्कॉन युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
.