कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

जालना : सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीला जालना जिल्ह्यातील परतूर येथे काल बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून इंदोरीकर महाराज थोडक्यात बचावले असून, त्यांच्या गाडीचा चालक मात्र जखमी झाला आहे. इंदोरीकर महाराजांची गाडी रस्ता ओलांडणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.

बुधवारी (१३ एप्रिल) रात्री जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी ते आपल्या एम. एच. १२/टी. वाय. १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने ते खांडवीवाडी येथे जात होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरनजीक एका वळणावर हॉटेल ‘मधुबन’ समोर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परतूरचे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिस कर्मचारी शाम पांढरपोटे, नरेंद्र चव्हाण, दीपक खरात आदी घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे नेण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कीर्तन नियोजित वेळेत पार पडले.

Share