आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले आणि गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत. आयएनएस विक्रांत निधीमध्ये मी दीड दमडीचा घोटाळा केला नसल्याचे सांगत, आपल्याविरोधातील कटाचे मास्टरमाईंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून, त्यांच्या सांगण्यावरून माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाला. ठाकरे कुटुंबियांचा घोटाळा बाहेर काढत असल्यानेच माझ्यावर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी मुंबई विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला.

आयएनएस विक्रांत युद्धनौका जतन करण्यासाठी २०१३ मध्ये गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याच्या आरोपांनंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आज हायकोर्टाने सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर अटकेच्या भीतीने गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले किरीट सोमय्या अखेर मुंबईत दाखल झाले आहेत.


होमवर्कसाठी भूमिगत झालो होतो
मी होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो, असे सांगत पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. त्यांनी मला फक्त दिलासा दिला त्यामुळे नाही तर त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे. कोर्टाने उपस्थित केलेला प्रश्न मी गेल्या आठ दिवसांपासून उद्धव ठाकरेंना विचारत आहे. सीएमओचे काम फक्त पोलिसांना माफियागिरी करायला लावायची, खोट्या एफआयआर फाईल करायच्या, अटक करुन जेलमध्ये टाकायची भाषा करायची हे होत आहे, महाराष्ट्र पहिल्यांदाच हे सर्व अनुभवत आहे.

कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले, आम्ही दमडीचाही घोटाळा केलेला नाही. ५८ कोटींची भाषा संजय राऊत यांनी वापरली होती. हा आठवा आरोप होता आणि आठही आरोपांमध्ये एकही कागदी पुरावा नाही. फक्त स्टंटबाजी करत दोन-पाच दिवस मीडियाचे लक्ष वेधायचे एवढेच ते करत होते. न्यायालयावर मला विश्वास आहे. न्याय मिळायची सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार माझ तोंड बंद करू शकत नाही, महाविकास आघाडी सरकारचा घोटाळा बाहेर काढणारच, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना ‘भाग सोमय्या भाग’ असा चित्रपट काढायला हवा, असे म्हटले होते. यावर उत्तर देताना सोमय्या म्हणाले, हे जे नाटक गेले चार-पाच दिवस सुरु होते ते उद्धव ठाकरे यांनीच ठरवले होते. संजय राऊत प्रवक्ता आहेत. मास्टरमाइंड उद्धव ठाकरे आहेत. कारण त्यांच्या मुलांचे-पत्नीचे घोटाळे बाहेर यायला लागले, म्हणून कसेही करून सोमय्याला जेलमध्ये टाका. यासाठी हे सर्व करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

Share