पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक

चंदीगड : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि कॉँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी मनप्रीत नावाच्या व्यक्तीला उत्तराखंडमधून अटक केली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आजच पोलिसांनी मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मनप्रीतला अटक केली.

सिद्धू मुसेवाला हे रविवारी (२९ मे) मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच मुसेवाला यांची सुरक्षा पंजाबमधील आप सरकारने काढल्याने आप सरकारविरोधात संतापाची लाट उसळली होती.

मुसेवाला यांच्यावर  मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार; आई-वडिलांना दु:ख अनावर 
दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्यावर मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुसा येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गायक गुरुदास मान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, आमदार सुखजिंदर रणधावा आदींसह मुसेवाला यांचे हजारो चाहते तसेच राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. मुसेवाला यांच्या चाहत्यांनी अंत्यसंस्कारावेळी पंजाबमधील आप सरकारविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. मुलाला शेवटचा निरोप देताना मुसेवाला यांच्या आई-वडिलांना दु:ख अनावर झाले.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मनप्रीत याला उत्तराखंडमधून आज अटक करण्यात आली आहे. काल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा जणांमध्ये त्याचा समावेश होता. आरोपी मनप्रीत याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने घेतली आहे. गोल्डी हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार मानला जातो. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पंजाब पोलिस करत आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काल पंजाब पोलिसांनी उत्तराखंड पोलिस आणि स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने डेहराडूनमधून सहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एकजण लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा पोलिसांना संशय असून, त्याचा मुसेवालाच्या हत्येत सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.

Share