मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या भाषणाचा तेथील पोलिस आयुक्तांनी अभ्यास केला आहे. आवश्यकता वाटल्यास पोलिस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील. आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेठ बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलिस दल सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मेचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला असून, त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या भाषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दल अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. आज (३ मे) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलिस दल कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे. सर्व पोलिस दलाला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुस्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई होणार
याआधी समाजकंटकांवर आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून, १३ हजार जणांना कलम १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यात एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यातील जनतेने शांतता आणि सुव्यवस्था राखावी, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही रजनीश सेठ यांनी केले.
राज्यभर कडक पोलिस बंदोबस्त तैनात
एसआरपीएफच्या ८७ तुकड्या, राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात केले आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, राज्यभर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा रजनीश सेठ यांनी यावेळी दिला.