‘महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय…’, अभिनेता आरोह वेलणकरचे ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर मराठी अभिनेता आरोह वेलणकर याने भाष्य केले आहे. ”महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय…”, असे ट्विट अभिनेता आरोह वेलणकरने केले असून, त्याच्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.

सोमवारी विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष ७ अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन गुजरातमधील सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. या आमदारांना काल रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आले. शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वापुढे तीन मागण्या ठेवल्या आहेत. शिवसेनेने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या सध्याच्या सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला अर्थात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

शिंदे यांच्या मागण्या आणि त्यांच्याकडे मोठा पाठिंबा असल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. शिंदे यांचे मन वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत; परंतु शिंदे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. त्यानंतर आता एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना जोर आलेला असताना दुसरीकडे यावर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आज रात्रीपर्यंत ५० आमदार माझ्या बाजूने असतील, अशी माहिती शिंदे यांनी माध्यमांना दिली आहे. यामुळे ठाकरे सरकार पडण्याचे संकेत दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आरोह वेलणकर याने महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय घडामोडीवरही तो भाष्य करत असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तो बराच सक्रिय असतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजपला असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यात गेली दोन दिवस महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर आरोह वेलणकरने भाष्य केले आहे. काल त्याने ट्विट करत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. ‘परत जाऊ नका, म्हणजे मिळवलं’ असे खोचक विधान आरोहने केले होते.आज त्याने थेट महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्राचे एकूण ५० आमदार हे सध्या आसाममधील गुवाहाटी इथे उपस्थित आहेत. महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय, असे मला वाटत आहे. चला पाहू पुढे काय होतेय?” असे ट्विट आरोह वेलणकरने केले आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच काहींनी आरोहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

Share