अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : बॉलिवूडचे ज्‍येष्‍ठ अभिनेते धर्मेंद्र यांना चार दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

चार दिवसांपूर्वी व्यायाम करत असताना धर्मेंद्र यांना पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत आपल्या तब्येतीविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र म्हणाले, “मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मी जे केले त्याचा परिणाम मला सहन करावा लागला आहे. पाठीवरची एक मांसपेशी खेचली गेल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागच्या ४ दिवसांमध्ये मला बराच त्रास झाला; पण आता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वादांमुळे मी ठीक आहे आणि घरी परतलो आहे. काळजी नसावी. यापुढे मी असे काहीच करणार नाही. काळजी घेईन.” धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव नेहमीच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्यांनी १९६० मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘यादों की बारात’, ‘धर्मवीर’, ‘सीता और गीता’, ‘चरस’, ‘ड्रीम गर्ल’, ‘प्रतिज्ञा’, ‘लोफ़र’, ‘फूल और पत्थर’, ‘आया सावन झूम के’, ‘नौकर बीवी का’, ‘क्रोधी’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘कर्तव्य’, ‘हुकूमत’, यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आगामी काळात ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात जया बच्चन, शबाना आजमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Share