राज ठाकरे यांनी राज्यातील तमाशा थांबवावा : नाना पटोले

नागपुर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेत मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकर जर ४ तारखेपर्यंत उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणानंतर काॅंग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंना टोला लागवला आहे.

नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एक मे रोजी झालेल्या सभांमध्ये सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती असं म्हणाले. खरं तर आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं भाषण केलं त्याच पद्धतीचं राज यांचं भाषण होतं. जनतेच्या मूळ प्रश्नावर बोलतील अशा अपेक्षा होत्या, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. पुढे बोलताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा निर्वाणीचा इशारा कुठेही कामात येणार नाही. महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न थांबवावा,असं आवाहन नाना पटोलेंनी केलंय.

पुढे ते म्हणाले, धार्मिक वाद सुरु केलाय तो काही बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी वाद योग्य नाही असंही पटोलेंनी म्हटलंय. काॅग्रेस पक्ष धार्मिक वादात पडू इच्छित नाही. पडणार पण नाही. काॅग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे.काँग्रेसची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार आहे. जी महागाई आहे, बेरोजगारी वाढलीय. शेतकऱ्यांचे, गरीबांचे प्रश्न घेऊन काँग्रेस लढेल. या लोकांना न्याय मिळून देणे ही आमची भूमिका आहे, असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. चार तारखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन करण्यात आल्याप्रकरणी बोलताना, यासाठी शासन सक्षम आहे. राज्य सरकार कारवाई करायला सक्षम आहे, असं नाना पटोलेंनी म्हटलं.

राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना, भाजपाच्या वतीने केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे सुरु झालंय. यापद्धनं अशा (राज ठाकरेंसारख्या) लोकांचा वापर करुन धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरु झालाय तो चुकीचा आहे. या भूमिकेमुळे आता राज्यातील जनता भाजपाला माफ करणार नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झालीय,” असा टोला नाना पटोलेंनी लगावला.

Share