अफगाणिस्तानच्या मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या

नाशिक : येवला तालुक्यातील नियोजित चिचोंडी एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तानच्या ३५ वर्षीय मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती असे हत्या करण्यात आलेल्या धर्मगुरूचे नाव आहे. ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा पोलिसांनी काही तासांत छडा लावला आहे. अफगाणी धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद चिश्ती यांची हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याची माहिती नाशिक (ग्रामीण) चे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ख्वाजा सय्यद चिश्ती यांची हत्या त्यांच्या ड्रायव्हरनेच केल्याचे समोर येत असल्याचे ते म्हणाले.

‘सुफी बाबा’ नावाने ओळखले जाणारे सय्यद चिश्ती अनेक वर्षे नाशिक जिल्ह्यातील येवला येथे वास्तव्यास होते. या हत्येमागे कोणतेही धार्मिक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. संपत्ती किंवा पैशांच्या वादातून हत्या झाल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र, पोलिस इतर सर्व बाजूंची पडताळणी करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. येवला तालुक्यातील चिचोंडी (खुर्द) येथील चिचोंडी-बदापूर रोडच्या लगत असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवारी (५ जुलै) सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसपाटील वनिता सोमनाथ मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली. येवला शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खडांगळे, उपनिरीक्षक मनोहर मोरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पोलिसांच्या चौकशीत अफगाण नागरिक असलेला सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती (अंदाजे वय ३६) या युवकास गोळी झाडून ठार करण्यात आल्याचे दिसून आले. घटनेनंतर चार अनोळखी व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन पळून गेल्याचे समजले. दरम्यान, रात्री उशिरा नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चिचोंडी (खुर्द) येथे घटनास्थळी पोलिसांना एका भूखंडावर नारळ, अगरबत्ती, कुंकवाची डबी आढळून आली. पूजेचा प्रकार कशासाठी करण्यात आला होता? या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खून झालेल्या सय्यद जरीब चिश्ती यांच्यासोबत असलेल्या गफार आणि आणखी एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या सय्यद जरीब चिश्ती यांचे यू-ट्यूबवर हजारो फॉलोअर्स असल्याचे तपासात समोर आले आहे.

सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांनी वावी परिसरात ५ एकर जमीन त्याच्या मॅनेजरच्या नावावर घेतली होती. त्यांची आणखी काही प्रॉपर्टीही आहे. स्वतःला तो मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंचा अवतार सांगत असे. त्याचे देश-विदेशात अनुयायी असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्याला येवल्यात एका जागेची पाहणी करायची आहे, असे सांगून चिश्ती यांना काल वावी येथून दोन जण घेऊन आले. सोबत त्याचा मॅनेजरही होता. येवल्याच्या चिंचोडी एमआयडीसी भागात आल्यानंतर येथे अगोदरच तीन जण उपस्थित होते. त्यांनी गोळी झाडून सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांची हत्या केली. गोलीबाराचा आवाज ऐकून स्थानिकांनी दोघांना पकडले, तर चौघे जण फरार झाले. मारेकऱ्यांमध्ये सुपारी घेऊन हत्या करणारे गुंड असल्याचे समोर आले आहे. त्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी आणि सय्यद जरीब चिश्ती हे गाडीतून चिचोंडी (खुर्द) येथे गेले होते. येवल्यात दोन-तीन ठिकाणी पूजा केल्यानंतर त्यांनी जेवण केले. यानंतर एमआयडीसीत एके ठिकाणी जमीन खरेदी करायची असल्याने पूजा करायचे असल्याचे सांगत चालक आणि इतर आरोपी सय्यद चिश्ती यांना तिथे घेऊन गेले. यानंतर गाडीत बसत असताना आरोपींनी गोळी घालून त्यांची हत्या केली आणि फरार झाले. यामध्ये तीन मुख्य आरोपी असून,  गाडीचालक सध्या फरार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Share