संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली; आ. शंभूराज देसाई यांची टीका

सातारा : संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेत फूट पडली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, अशा शब्दात शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनंतर शंभूराज देसाई आज साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती, असा गंभीर आरोप करून शंभुराज देसाई म्हणाले, आमचे अनेक नेते सांगतात की, कोणीतरी उद्धव ठाकरेंच्या जवळ असणाऱ्या मोठ्या व्यक्तीने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षात दिसून आले आहेत. शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार एका बाजूला गेले आहेत. हा ट्रेन्ड हळूहळू खालीपर्यंत जाणार आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले आहे. त्यांनी अडीच वर्षे जी काही बडबड केली त्याला कोणीही महत्त्व देणार नाही. ज्या संजय राऊतामुळे हे सगळे झाले त्याला आपण महत्त्व देत नसल्याचे देसाई म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी १५ लोकांची शिवसेना की, ४१ लोकांची ते ठरवावे. आम्ही आजही शिवसेनेत आहोत, आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेण्याचे काम करत आहोत. या भावनेतून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जाण्याचे ठरवले आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला का, यावर ते म्हणाले, आम्ही जिथे राहत होतो तिथे रेंज नसल्याने आमचा फोन लागत नसल्याचे सांगत देसाई यांनी या प्रश्नावर अधिक बोलण्याचे टाळले.
शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही
शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल, असे सांगितले होते; पण अडीच वर्षात हे सरकार गेले. आता शरद पवार म्हणत आहेत मध्यावधी लागणार; पण तसे होणार नाही, असेही देसाई म्हणाले.

५० कोटी घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन!

आमची काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नाही बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसने आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आम्ही शिंदे साहेबांच्या खांद्यावर मान ठेवली आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जी महाआघाडी झाली ती अनैसर्गिक होती. याबाबत आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना माघारी जाऊया असे म्हणत होतो; पण त्यांनी ते ऐकले नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. प्रत्येक बंडखोर आमदाराला ५० कोटी दिल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी पुरावा आहे का? अशी विचारणा करून पैसे घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन, असेही ते म्हणाले.

ज्या युतीच्या जीवावर मते मागितली, ती तोडून अनैसर्गिक युती कशी करायची हे आम्ही पक्षनेतृत्वाला सांगितले होते. आमची पहिल्यापासून आमच्या पक्ष नेतृत्वाकडे भाजपसोबत जाण्याची मागणी होती. गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांची शिवसेनेत गळचेपी झाल्याने हा उठाव केल्याचे देसाई म्हणाले. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असेल तर विकास नक्की होतो. त्यासाठी आम्ही पुन्हा भाजपसोबत युती केली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर आम्ही हे सगळे करत आहोत. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही त्यांना शब्द दिला आहे की, शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहू, असे देसाई यांनी सांगितले.

Share