विधानसभेत अजित पवारांनी बंडखोर आमदारांना दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली!

मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव बहुमतांनी जिंकला. त्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला, असा पाढा अनेकांनी वाचला; पण ते खरे नाही. निधी देण्यात राष्ट्रवादीने कधीही दुजाभाव केलेला नाही. कुठेही पैसे देण्यात मी भेदभाव केलेला नाही, असे सांगत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांना आणि बंडखोर आमदारांना दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली.

शिवसेना व अपक्ष आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. आम्हाला निधी मिळत नव्हता, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती. आज अजित पवार यांनी त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या नेत्यांना अर्थमंत्री असताना किती निधी उपलब्ध करून दिला, याची आकडेवारीच सादर केली. दादाजी भुसे यांना ३०६ कोटी, गुलाबराव पाटील ३०९ कोटी, शंभुराज देसाई २९४ कोटी, अब्दुल सत्तार २०६ कोटी, अनिल बाबर २८६ कोटी, महेश शिंदे १७० कोटी, शहाजीबापू पाटील १५१ कोटी, महेंद्र थोरवे यांना १५४ कोटींचा निधी दिल्याचे पवारांनी सांगितले.

निधी देताना मी कसलाच भेदभाव केला नाही
मी काम करताना भेदभाव कधीच करत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आमदार निधी मीच दोन कोटी रुपयांवर नेला. २८८ आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे हा माझा प्रयत्न होता. आतापर्यंत काम करताना मी कसलाच भेदभाव केला नाही. शिवसेनेचे जे आमदार माझ्याकडे आले, त्यांना मी कधी मोकळ्या हाताने परत पाठवले नाही. निधी दिला म्हणजे उपकार केला नाही; पण मी भेदभाव करणारा माणूस नाही, हे मला सांगायचे आहे. माझी आणि राष्ट्रवादीची जी बदनामी होत आहे, ती आमदारांनी थांबवावी. जरा खरे बोलावे, अशा शब्दात अजित पवारांनी बंडखोरांना खडसावले.

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला असा पाढा अनेकांनी वाचला. मी काम करताना भेदभाव कधीच करत नाही हे तुम्हाला माहिती आहे. शिंदेसाहेब आपण खाजगीत बोलत होतो. पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास खात्याला अजून निधी देण्याचा मी शब्द दिला होता. सर्व खात्यांना पुरेसा निधी दिला. शिवभोजन थाळी केंद्राच्या वेळीही शिवसेना आमदारांच्याच सर्वाधिक शिफारशी मान्य केल्या. मग माझे काय चुकले, असा सवालही त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला

अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर मिश्कील टिप्पणी करत त्यांची शैली पूर्वीसारखी आक्रमक वाटली नसल्याचे म्हटले. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकही त्यांनी केले. ते म्हणाले, आज अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. ११ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, कोर्ट निर्णय देईल, मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घ्यायचे कारण होते का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांनी म्हटले की, देवेंद्रजी, मी तुमचे भाषण बारकाईने ऐकले. तुम्ही एकनाथ शिंदे यांचे इतके समर्थन केले. एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा तुम्ही त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ दिले होते. एकनाथ शिंदे एवढे कर्तृत्त्ववान होते तर त्यांना फडणवीसांनी एकच खाते का दिले? नेता मोठा असला, त्याचे वजन जास्त असले की, त्यांच्याकडे जास्त खाती असतात हे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना माहिती असेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, नियोजन, महसूल, वन, कृषी आणि सहकार इतक्या खात्यांचा कारभार होता. जर राज्याचे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढेच सर्वगुणसंपन्न होते तर मग त्यावेळी तुम्ही त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ का दिले? या खात्याचा जनतेशी थोडाही संबंध नव्हता. फक्त रस्ते आणि बोगदे बांधायेच, हेच त्यांचे काम होते. या सगळ्या गोष्टींवर विचार झाला पाहिजे, असे पवार म्हणाले.

 

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक केल्याच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी टिप्पणी केली. देवेंद्रजी वारंवार एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक म्हणत आहेत. त्यांना सारखे-सारखे शिवसेनेचे नाव का घ्यावे लागते, याचेही आत्मपरीक्षण झाले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

नेता फुटला की, नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाहीत हा इतिहास आहे

एकनाथ शिंदे यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, शिवसेनेचा इतिहास आहे की, नेता फुटला की, नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाहीत हा इतिहास आहे. तो इतिहास तुम्ही लक्षात ठेवा. येत्या निवडणुकीत ते दिसेलच. तुम्ही उद्धव ठाकरेंना विश्वासात घेऊन हे केले असते तर आणखी चांगले वाटले असते, असे म्हणत अजित पवारांनी मनातील खंत व्यक्त केली. एका गोष्टीचे कुतूहल आहे. ज्या वेळेस भाजप आणि शिंदे गट यांनी सरकार स्थापन करायचे ठरवले त्यावेळी १०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, ४० आमदाराची व्यक्ती मुख्यमंत्री होते. त्यात नक्की काही तरी काळंबेरं आहे. भाजपचे आमदार भविष्यात शिंदेंच्या मंत्र्यांना बोलायला मागे पुढे पाहणार नाहीत. आमच्यामुळे तुमचे सरकार आहे, असे म्हणतील, असे अजित पवार म्हणाले.

Share