शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल; पण आता मागे हटणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : माझे गेल्या अडीच वर्षात खच्चीकरण करण्यात आले. मी सत्तेच्या मोहापायी बंड केले नाही. आम्ही गद्दार नाही तर सच्चे शिवसैनिक आहोत. विधान परिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला. म्हणून त्या अन्यायाविरोधात मी बंड केले. मी ठरवले की, जे होईल ते होऊदे, लढून शहीद झालो तरी चालेल. आता शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल; पण मागे हटणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.

विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर भाष्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. बहुमताचा ठराव जिंकताच मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील ‘व्हॅट’ कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. आम्हाला फार चांगले अनुभव आले नाहीत. विधान परिषद निवडणुकीवेळी माझ्यावर अन्याय करण्यात आला. न्यायासाठी बंड करायला बाळासाहेबांनी शिकवले. मला ज्या पद्धतीने वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार हे आमदार आहेत आणि पुढे बसलेले आमदार आहेत. अन्याय झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे बंड आणि उठाव केला. आम्ही स्वार्थासाठी नव्हे विचारांसाठी एकत्र आलो आहोत. एका बाजूला सत्ता, सरकारी यंत्रणा होती, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सामान्य सैनिक होता. माझ्यासोबत आलेल्यांपैकी एकाही आमदाराने विचारले नाही की, किती दिवस लागतील. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.

माझे खच्चीकरण करण्यात आले

गुजरातला जाताना एकही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊया, असे मला म्हणाला नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हा त्यांचा विश्वास आहे. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. माझे कशा प्रकारे खच्चीकरण करण्यात आले हे सुनील प्रभू यांनादेखील माहिती आहे. मी माझ्या आमदारांना सांगितले होते, तुम्ही अजिबात चिंता करू नका, ज्या दिवशी मला वाटेल की, तुमचे नुकसान होतेय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमचे भवितव्य सुरक्षित करुन मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईन. ही छोटी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही इकडून तिकडे जाण्याची हिंमत करत नाही. हे का झाले? कशासाठी झाले? का केले? या सर्वांच्या मुळाशी जायला हवे होते. याचे कारण शोधायला हवे होते, असेही शिंदे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आता शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. माझ्यासोबत गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेच्या ४० आणि छोट्या पक्षांच्या १० आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस केले, त्यांचे मी अभिनंदन करतो. मला आता विश्वास बसत नाही की, मी मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. कारण आज आपण पाहिले महाराष्ट्रातील अनेक घटना पाहिल्या तर लोकप्रतिनिधी असतील, खासदार, आमदार, नगरसेवक असतील. ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जातात. देवेंद्र फडणवीसांनी मला या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतल्याचे सांगितले, असे शिंदे म्हणाले.

आ. संतोष बांगर शिंदे गटाकडे कसे गेले? खुद्द एकनाथ शिंदे यांनीच सांगितला किस्सा
अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात चौफेर टोलेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० वे आमदार आपल्याकडे कसे आले, याचा किस्सा सांगितला. काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आ.संतोष बांगर यांनी फोन केला. आपली चूक झाली असून मला तिथे यायचे आहे, असे बांगर यांनी सांगितले. त्यानंतर बांगर हे आमच्याकडे आले. शिवसेनेतून आणखी काही आमदार यांच्याकडे येणार असल्याचे आ. बांगर यांनी सांगितले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे याप्रसंगी म्हणाले.

Share