शिवसेना आमदार संतोष बागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंड केल्यानंतर कसेबसे १६ आमदार थोपवून धरलेल्या शिवसेनेला सोमवारी सकाळी आणखी एक धक्का बसला. अगदी कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करणारे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बागर हेदेखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. बांगर हे शिंदे गटात गेल्याने शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे, तर उद्धव ठाकरे गटातील आमदारांची संख्या १५ वर आली आहे.

आज सोमवारी सकाळी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी आ. संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसून आले. आज आ.संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांसोबत विधानभवनात प्रवेश केल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले. आ. संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. विशेष म्हणजे त्यांनी काल रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते; पण आज त्यांनी शिंदे सरकारने सभागृहात मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. अगोदरच विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा अधिकृत गटनेता आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत भर पडली होती. त्यामध्ये आता आ.संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आणखी एक आमदार साथ सोडून गेल्याने शिवसेनेची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.

 

शिवसेनेचा एक-एक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुहावाटीला जात असताना आ.संतोष बांगर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यामागे उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेचे कळमनुरीसह राज्यात कौतुक झाले. शिवसेना कार्यकर्त्यांनी तर त्यांना डोक्यावर घेतले. आ.संतोष बांगर यांनीही आपल्या मतदारसंघात भावनिक भाषणं ठोकली. अगदी ‘बंडखोर आमदारांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांनाही बायका मिळणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. मागील महिन्यात म्हणजेच २४ जूनला हिंगोलीमध्ये शिवसेनेच्यावतीने बंडखोरांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बंडखोरांविरोधात भूमिका घेतल्याने आ.बांगर यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

उद्धव ठाकरेंसाठी ढसाढसा रडले होते आ. संतोष बांगर
यावेळी भाषण करताना संतोष बांगर ढसाढसा रडले होते. तुम्ही पुन्हा पक्षात या, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, असे आवाहन त्यांनी बंडखोर आमदारांना केले होते. बंडखोर आमदार येतील तेव्हा त्यांना सोडू नका. त्यांचे स्वागत सडके टमाटे आणि अंडे फेकून करा. बंडखोरी केल्याने त्यांचे तोंड आधीच काळे झाले आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझी एवढी मोठी मिरवणूक काढली नव्हती, ती आज काढण्यात आली. शिवसैनिक कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असणार असल्याचे आ.बांगर यांनी म्हटले होते. या भाषणाची जोरदार चर्चा झाली होती.

शिवसेना पक्षातील बंडाळीदरम्यान आमदार संतोष बांगर यांना १०० कोटी रुपयांची ऑफर आल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. यानंतर आ. बांगर यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आपण पैशाला बळी पडणार नाही. बाळासाहेबांनी व शिवसेनेने माझ्यावर फार मोठा विश्वास टाकला आहे. त्यांच्या विश्वासाला मी मरेपर्यंत तडा जाऊ देणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याबरोबर ‘ईडी’ सारख्या चौकशीला मी घाबरणारा आमदार नसून ‘ईडी’ मागे लावणार असेल तर त्याला आपण काडी लावू, असे प्रत्युत्तर आ. बांगर यांनी दिले होते.

अडचणीच्या काळात संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने कळमनुरीच्या शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. यावेळी आ.बांगर कमालीचे भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी अश्रू ढाळले. आज मी शिवसेनेसोबत आणि ठाकरेंसोबत आहे, म्हणून शिवसैनिकांनी माझे जोरदार स्वागत केले, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली; पण मी जर बंडखोरांसोबत गेलो असतो तर माझी अवस्था काय झाली असती. मी शिवसेनेत आहे म्हणून मला किंमत आहे, नाहीतर माझी लायकी काय? अशा आशयाची भाषणे करून आ. संतोष बांगर यांनी शिवसैनिकांची मनं जिंकली होती. मात्र, आता आ. संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

Share