अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे; पण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच नवा वाद सुरू झाला आहे. ज्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुर्जर समाजाच्या एका संघटनेने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. १२ व्या शतकातील सम्राट पृथ्वीराज चौहान राजपूत नाही तर एक गुर्जर राजा होते, असा दावा या संघटनेने केला आहे. ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांना एक गुर्जर राजा म्हणूनच दाखवण्यात यावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे.

गुर्जर समाजाच्या अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा या संघटनेने दावा केला आहे की, पृथ्वीराज चौहान हे एक गुर्जर राजा होते. महासभेचे आचार्य वीरेंद्र विक्रम यांच्या म्हणण्यानुसार, ‘पृथ्वीराज रास भाग १’ मध्ये पृथ्वीराज चौहान याचे वडील सोमेश्वर हे एक गुर्जर राजा असल्याचा उल्लेख आहे. असे बरेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की, पृथ्वीराज चौहान हे गुर्जर राजा होते. म्हणून चित्रपट निर्मात्यांकडे आमची मागणी आहे की, चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांना राजपूत नाही तर गुर्जर राजा म्हणून दाखवण्यात यावे, असे आचार्य वीरेंद्र विक्रम यांनी म्हटले आहे.

गुर्जर संघटनेचे राज्याध्यक्ष मनीष भारगद यांनी म्हटले आहे की, त्यांच्या संघटनेने गेल्या वर्षी यासंदर्भात ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या निर्मात्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यासमोर यासंदर्भातले अनेक ऐतिहासिक पुरावे सादर केले होते. याच भेटीत सिनेमात योग्य प्रकारे राजा पृथ्वीराज यांचा उल्लेख व्हावा, अशी मागणीही केली होती. त्यावेळी आम्हाला निर्मात्यांनी योग्य बदल केले जातील, असे आश्वासन दिले होते. आमच्या गुर्जर समाजाविरोधात कुठलाही उल्लेख नसेल असे सांगून आम्हाला आश्वस्त केले होते. आता सिनेमा प्रदर्शित होतोय म्हणून आम्ही पुन्हा निर्मात्यांना आमच्या मागणीची आठवण करून देत आहोत आणि जर आमच्या मागणीनुसार या चित्रपटात बदल केले नसतील तर हा या चित्रपट होण्यावर आमचा आक्षेप आहे.

‘पृथ्वीराज’ या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.

Share