फळ, ज्यूस प्रक्रिया निर्यातीतून भारताला मिळाले १०५०३ कोटींचे परकीय चलन

नवी दिल्ली : भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जाच्या फळ निर्यातीबरोबरच भाजीपाला, फळांवर प्रक्रिया करून तो पक्का माल परदेशात निर्यात केला जात आहे. या निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये देशातून तब्बल १२ लाख ६८ हजार २५८ मेट्रिक टन प्रक्रियायुक्त भाजीपाला, फळ व ज्यूस यांची निर्यात होऊन भारताला सुमारे १० हजार ५०३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ११६१ कोटी रुपयांनी निर्यात वाढली आहे.

देशातून भाजीपाला, फळ व ज्यूस प्रक्रिया या शेतीपिकावर आधारित उद्योगांमार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पश्चिम भारतातील चार राज्यांमध्ये फळांचे एवढे उत्पादन होऊ शकते की, संपूर्ण जगाला ही उत्पादने पुरवू शकतो. विशेषत: महाराष्ट्रामध्ये फळांच्या उत्पादनाची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये विशेषत: द्राक्ष, डाळिंब, बोर, केळी, पेरू, नारळ, आंबा, चिकू ही फळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. त्यावर प्रक्रिया करून देशाच्या गंगाजळीत परकीय चलनाची भर पडत आहे. भाजीपाल्याचे व फळांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादित केलेले टिकवून ठेवणे व आवडीनुसार त्यात बदल करण्यासाठी, हवे तेव्हा खाण्यासाठी उपलब्ध होण्याकरिता फळे, भाजीपाल्यावर प्रक्रियाच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात फळे आणि भाजीपाल्याच्या एकूण उत्पादनाच्या जेमतेम २ ते ५ टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते.

अशी आहे प्रक्रियायुक्त भाजीपाला, फळ व ज्यूसची निर्यात व मिळालेले परकीय चलन

  • सन २०१८-२०१९ – ११ लाख ९६ हजार मे. टन – ९१९६ कोटी रुपये
  • सन –२०१९-२०२० – ११ लाख २४ हजार मे. टन – ९२०६ कोटी रुपये
  • सन –२०२०-२०२१ – १३ लाख २८ हजार मे. टन – ११३७५ कोटी रुपये
  • एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ – १२ लाख ६८ मे. टन – १०५०३ कोटी रुपये
Share