कुचिक बलात्कार प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न : चित्रा वाघ

मुंबई : पुण्यातील शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने  भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनीच आपल्याला फूस लावल्याचा आणि आपल्याला सुसाईड नोट लिहिण्यास तसेच पोलिसांकडे जबाब नोंदवण्यास मला भाग पाडल्याचा  आरोप पीडित तरुणीने केला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून, या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले. वाघ म्हणाल्या, राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना, अनेक नवीन विविध अनुभव येत असतात, त्यातलाच एक अनुभव हा आजच मला आला आहे. पुण्यातील शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याने एका मुलीवर बलात्कार केला. जबरदस्तीने तिचा गर्भपात केला, तोदेखील चार विविध ठिकाणी नेऊन. अशा पद्धतीचे पत्र आणि प्रत्यक्ष भेट ही पीडितेची आणि माझी झाली.
१६ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाला सुरुवात झाली. तेव्हा एका मुलीचा मला फोन आला. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये मला गुन्हा दाखल करायचा आहे आणि तुमची मदत हवी आहे, असे तिने सांगितले. मी त्या दिवशी महाराष्ट्रात नव्हते, त्यामुळे आल्यावरती भेटू आणि गरज लागली तर नक्की फोन कर, असे मी तिला सांगितले. त्यानंतर पुण्यात पीडितेची आणि माझी भेट झाली. तिने २०१७ पासून घडलेली सगळी आपबिती मला सांगितली. असा कोणी माणूसच नाही या पृथ्वीवर की, ज्याने हे सगले ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही किंवा तो विचार करायला भाग पडणार नाही. तसेच माझ्यासोबतही झाले. एक मुलगी जी कुणाच्याही पाठिंब्याशिवाय लढते आणि तिच्या एकटेपणाचा कुठेतरी गैरफायदा घेतला जातोय. एकदा, दोनदा नाही तर तीनवेळा अशा पद्धतीचा प्रकार तिच्यासोबत घडला आणि तिच्या बाजूने लढायचे मी ठरवले. चूक केली का मी? एखादी पीडिता जर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येऊन सांगते आहे, त्या पुराव्यासह ती मांडते आहे. मला काय माहिती कुठले पुण्यातले चार रुग्णालयं, मला काय माहिती की, मंगेशकर रुग्णालयास कुचिकचं कुठलं ओळखपत्र देण्यात आलं. मात्र, ही सगळी माहिती मला त्या मुलीकडूनच मिळाली. जेव्हा त्या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की, नाही ही एकटी लढत आहे अशावेळी आपण तिच्यासोबत उभा राहिलं पाहिजे, असे म्हणून मी तिच्या बाजूने उभा राहिले. मी जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा तिने मला येऊन सांगितलं होतं की, तिला कसा त्रास दिला जातोय. तीनवेळा तर मी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना सांगितलं आहे की, तिची तब्येत बरी नाही तिच्यावर उपचार करा. परवा तिला आमच्या वैद्यकीय आघाडीच्या महिलांनी ससून हॉस्पिटलला लदेखील नेलं होतं. मुलगी तिथं अॅडमिट व्हायला तयार नव्हती, तिथून ती स्वत: जहांगीर हॉस्पिटलला गेली आणि मला मेसेज केला की, मला डिपॉझिटसाठी पैसे हवे आहेत, मला मदत करा. मी तिला तू जहांगीरला का गेलीस, असं विचारल्यावर तिने मला ससूनमध्ये माझ्यावर योग्य उपचार होत नाही, मला तिथे नीट वागवलं नसल्याचे तिने सांगितलं आणि जहांगीर हॉस्पिटलला गेली. तिथे देखील आमच्या डॉक्टर ताई होत्या, त्यांनी पैसे भरले आणि त्या मुलीवर उपचार केला. ही चूक झाली का आमची? या सगळ्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळतील, असे वाघ म्हणाल्या.

वाघ म्हणाल्या की, आम्ही त्या पीडितेसाठी जे काही करता येईल ते केलं. ती मुलगी पहिल्यांदा आमच्याकडे आली. मी स्वत:ला संपवते, असं ती म्हणत होती. मी तिचं ते पत्र पुण्यातील सीपींना पाठवलं. मात्र, एवढे सगळे करुनही जर ती मी दबाव टाकला असे म्हणत असेल तर त्या सर्व गोष्टी समोर आणाव्यात. मी चौकशीसाठी तयार आहे. मात्र, विरोधक जे काही आरोप करतायत की, ‘मी कोणाला ब्लॅकमेल करते हे साफ खोटे आहे. उलट, तुम्हीच बलात्काऱ्याला पाठीशी घालता आहात, असा आरोपही चित्रा वाघ यांनी विरोधकांवर केला. आता ती मुलगी कुठल्या मजबुरीमध्ये आहे, ती हे सगळं का करते आहे हे मला माहिती नाही.परमेश्वर तिचं भलं करो. मी केवळ ती एकटी लढते आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी तिच्यासोबत उभा होते. त्यावेळा कुणी आलं नाही, तेव्हा या प्रकरणाचं महत्व वाटलं नव्हतं का? पण जेव्हा माझं नाव आलं आणि मला अशा पद्धतीने चित्रा वाघने करायला लावलं असं जेव्हा त्या मुलीने सांगितलं, तेव्हा मात्र सगळे खडबडून जागे झाले. आता कदाचित नवीन एफआयआर पण करतील, आम्हाला अडकवायला. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, हे सरकारला मला सांगायचं आहे की हे सगळं करून तुम्ही माझा आवाज बंद कराल. तर हा तुमचा गैरसमज आहे. माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही मला असल्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करताय. पण माझी सगळी तयारी आहे. जिथं बोलवाल त्या ठिकाणी चौकशीला येण्याची माझी तयारी आहे. ती मुलगी जेव्हा एकटी लढत होती तेव्हा महाराष्ट्रातील कुठली महिला किंवा पक्ष तिच्या मदतीसाठी आला नाही. कुठल्या पक्षाची म्हणून मी तिला मदत केलीच नाही आणि आज तिने चित्रा वाघच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर सगळ्या महिला नेत्या एकत्र आल्या आणि माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत सुटल्या आहेत

Share