उद्धव ठाकरे-अजित पवारांच्या भेटीनंतर तासाभरातच आर्थिक गुन्हे शाखा सोमय्यांच्या घरी   

 

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आज सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयाची झडती घेतली असून, उद्या बुधवारी सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्यानंतर काही क्षणातच आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सोमय्या यांच्या घरी जाऊन धडकले आणि ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या कारवाईचे टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून या पैशाचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून, या दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर ते सध्या नॉट रिचेबल आहेत. सोमय्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली असून, या पथकांनी सोमय्यांचा कसून शोध सुरू केला आहे. किरीट सोमय्यांचे कार्यालय, निकटवर्तीय आणि इतर ठिकाणी ही पथके भेटी देत आहेत. मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीसाठी उद्या १३ एप्रिलला कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. सोमय्या यांच्या घरी कोणी नसल्याने पोलिसांनी सोमय्या यांच्या घराच्या दरवाज्यावर नोटीस चिटकवली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी धडकण्यापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. सुरुवातीला ही बैठक नियमित कामकाजासंदर्भात असावी, अशी चर्चा होती. मात्र, या बैठकीनंतर काही क्षणांतच किरीट सोमय्या यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जाऊन धडकले. या बैठकीचा आणि या कारवाईचा काहीही संबंध होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा सगळा योगायोग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात भेटीगाठींना वेग आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरी जाऊन कारवाई केली आहे. कोणताही मोठा निर्णय किंवा कारवाई होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सल्लामसलत होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि ईडी अधिकाऱ्यांच्या कनेक्शनसंदर्भात अनेक खुलासे केले होते. किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून ईडी मुंबईतील उद्योजक आणि बांधकाम व्यवसायिकांना धमकावून खंडणी गोळा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही राऊत यांनी केला होता. हे सर्व पुरावे राऊत यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले होते. तसेच आयएनएस विक्रांत प्रकरणातही राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर ५७ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या पिता-पुत्रांविरोधात कोणतीही ठोस कारवाई न केल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता होती. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने याच पुराव्यांच्या आधारे कारवाईला सुरुवात केली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Share