बिडकीन पोलिसांची कामगिरी,चार आरोपीसह ३८ लाखांचा गुटखा पकडला

औरंगाबाद-   जिल्ह्यातील बिडकीन पोलिसांनी सुमारे ३८ लाखांचा गुटखा पकडत चार आरोपींना अटक केली आहे. बिडकीन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून दोन महिन्यांपूर्वी बिडकीनच्याच एका आरोपीला औरंगाबादेत गुटखा विक्रीबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच बिडकीन पोलिसांनी गावातच चार ठिकाणी कारवाई करून चौघांना पकडल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

राज्यात सर्वत्र गुटखा तसेच सुगंधित पान मसाला विक्रीवर शासनाने बंदी घातलेली आहे. असे असताना बिडकीन आणि परिसरात गुटखा विक्री सुरु होती. त्यातच गेल्या दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादेतील उस्मानपुरा पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले होते. त्यातील एक जण बिडकीनचा असल्याने सर्वांचे लक्ष बिडकीनकडे वळले होते. गावात काही जण चोरून गुटखा विक्री करीत असल्याचे तसेच आसपासची गावेच नव्हे तर औरंगाबाद शहरातही गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची माहिती बिडकीन पोलिस तसेच ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

त्यानुसार बिडकीन पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून बिडकीनमधील चार ठिकाणी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एकाचवेळी धाडी टाकल्या. या धाडीत पोलिसांच्या पथकांना तब्बल ३७ लाख ५९ हजार ३८४ रुपयांचा गुटखा हाती लागला असून यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा तसेच पानमसाल्याचा समावेश आहे. या प्रकरणी बिडकीनचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष दयानंद माने यांच्या फिर्यादीवरून असलम हनीफ पठाण, युसुफ याकूब पठाण, परवेज रशीद पठाण, रिजवान शेख (सर्व रा. बिडकीन) या चार जणांवर महाराष्ट्र गुटखा बंदी कायद्यानुसार बिडकीन पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.  विशेष म्हणजे पोलिसांनी धड टाकलेल्या चारही ठिकाणी या माफियांनी गोदामात माल दडवून ठवलेला होता. पोलिसांनी या ठिकाणांहून गुटख्याच्या अनेक गोण्या जप्त केल्या आहेत.

Share