काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता!

मुंबई : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा तिरकस बाणही उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर सोडला.

दहा दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने काल (४ जुलै) विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करीत सत्तांतराचे नाट्य कसे घडले हे सांगितले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी आज शिंदे-फडणवीसांना टोमणे लगावले.

शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची आज मंगळवारी शिवसेना भवनात बैठक झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत कार्यरत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. कोण आले, कोण गेले याचा मला फरक पडत नाही. ज्यांना लढायचे असेल, त्यांनी माझ्यासोबत राहावे, पुन्हा नव्याने जोमाने शिवसेनेला उभा करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातले विकृत हसू आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू यातून मला मार्ग काढायचा आहे. शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. ज्यांच्यावरती विश्वास ठेऊ नका, असे सांगितले ते अजूनही सोबत आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच बंडखोरांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला मारला. उद्धव ठाकरे म्हणाले, काल विधानसभेत काय काय घडले हे आपण पाहिले. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचला. पुढच्या काळात ते काय काय खेचतील, कळणार पण नाही.

एकनाथ शिंदे यांचे ट्विटच्या माध्यमातून सडेतोड उत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टोल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.  ”रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार,” असे म्हणत मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

Share