शिवसेनेत भूकंप, एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असून ते गुजरातमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांचा गट सोमवारी संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल होता, अशी माहिती समोर आली होती. या बाबीची खातरजमा करण्यासाठीच काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीसाठी शिवसेनेचे १३ आमदार गैरहजर होते. पक्षाकडून या आमदारांना वारंवार संपर्क करण्यात येत होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा आमदारांना बोलावणं धाडलं आहे. या बैठकीला तरी आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असण्याने शिवसेनेतील अंतर्गंत कलह चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे नाॅट रिचेबल आमदार

१.शहाजी बापू पाटील

२.महेश शिंदे सातारा

३.भरत गोगावले

४.महेंद्र दळवी

५.महेश थोरवे

६.विश्वनाथ भोईर

७.संजय राठोड

८.संदीपान भुमरे

९.उदयसिंह राजपूत

१०.संजय शिरसाठ

११.रमेश बोरणारे

१२.प्रदीप जैस्वाल

१३.अब्दुल सत्तार

Share