अनिल परब यांना ईडीची तिसऱ्यांदा नोटीस; उद्या चौकशीसाठी बोलावले

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. आज सोमवारी (२० जून) विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू असताना अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी उद्या मंगळवारी (२१ जून) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनिल परब यांना समन्स बजावण्यात आले होते. मागच्यावेळी अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. यानंतर ते शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ईडीची नोटीस मला कालच मिळाली. मी मुंबईत नसल्यामुळे ईडी कार्यालयात जाऊ शकलो नाही. तसे ईडी कार्यालयाला कळविले आहे. मुंबईत गेल्यावर ईडी कार्यालयात जाईल. ते जे प्रश्न विचारतील त्याला उत्तरे देण्यासाठी मी बांधील आहे, असे परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. माझे शिर्डीला जाणे पूर्वनियोजित होते, असेही परब म्हणाले होते.

आता सोमवारी (२० जून) त्यांना तिसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी त्यांना उद्या मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल परब यांना ईडीने ही तिसरी नोटीस पाठवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. ईडीला साई रिसॉर्टच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय असून, त्यामुळे साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने २६ मे रोजी अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने त्या दिवशी अनिल परब यांची १३ तास चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने यापूर्वी अनिल परब यांना दोन वेळ चौकशीसाठी समन्स पाठवले होते. आता आज पुन्हा एकदा ईडीने त्यांना समन्स पाठवले आहे. या नोटीसनुसार परब उद्या मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share