राज ठाकरेंची तोफ रविवारी औरंगाबादेत धडाडणार

औरंगाबाद : औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाराष्ट्र दिनी १ मे (रविवार) रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला अखेर गुरुवारी पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली. सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, कोणत्याही समुदायाचा अनादर होणार नाही यासारख्या १६ अटी घालून या सभेला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, मनसेकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढावेत, अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. १ मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेमुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला परवानगी मिळणार की नाही ? याचीच चर्चा सुरू होती. दरम्यान, दोन दिवसांपासून मनसे नेते बाळा नांदगावकर हे औरंगाबादेत तळ ठोकून बसल्याने सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी गुरुवारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आणि ग्राऊंडवरील रिपोर्ट तपासून सभेच्या परवानगीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, गुरुवारी गुप्ता यांनी तीन पोलिस उपायुक्त, काही सहायक पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा त्यांनी केली आणि सभेला परवानगी दिल्याचे सांगून अटी व शर्तींचे पालन करण्याच्या सूचना केल्या.

सभेसाठी घालण्यात आलेल्या अटी

१) राज ठाकरे यांची ही जाहीर सभा १ मे २०२२ रोजी दुपारी साडेचार ते रात्री पावणे दहा या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये.
२) सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
३) सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासादरम्यान त्या-त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरिकांना त्यांची वाहने पार्किंगसाठी निर्धारि केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.
४) कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा त्यांचे प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करू नये.
५) अट क्रमांक २, ३ व ४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील.
६) सभेच्या कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल क्रमांक, तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरून संख्या, त्यांच्या येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहिती सभेच्या एक दिवस अगोदर पोलिस निरीक्षक, सिटी चौक पोलिस स्टेशन, यांच्याकडे देण्यात यावी.
७) सभास्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्या ठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकलाढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
८) सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स उभारावेत, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
९) सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा/ परंपरा यावरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
१०) सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे. ही अट न पाळल्यास ५ वर्षे इतक्या मुदतीचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
११) या कार्यक्रमादरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा (शहर बस सेवा, अॅम्ब्युलन्स, दवाखाना, मेडिकल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
१२) सभेच्या दिवशी वाहतूक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसूचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरिकांना बंधनकारक राहील.
१३) सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
१४) सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेड्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.
१५) या कार्यक्रमादरम्यान मिठाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिठाईतून कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
१६) हा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपणास घालून दिलेल्या उपरोक्त अटींचे व शर्तीचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे सर्व संयोजक व वक्ते यांच्यावर प्रचलित विधी, उपविधी व नियमानुसार कारवाई केली जाईल व अशा कारवाईदरम्यान ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईल याची नोंद घ्यावी.

Share