पोलिसांनी दाखल केलेला ‘एफआयआर’ खोटा : किरीट सोमय्या

मुंबई : पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून, सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे, असेही सोमय्या म्‍हणाले. शिवसेना ही ‘माफिया सेना’ तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘माफिया सेनेचे सरदार’ आहेत, असे म्हणत सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या २३ एप्रिल रोजी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये गेले असता शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला व बाटल्या फेकल्या. त्यात सोमय्या जखमी झाले. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिस माझा एफआयआर घेत नाहीत, असे म्हणत वांद्रे पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

खोटा एफआयआर दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा 

शनिवारी खार पोलिस स्टेशनबाहेर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी खोटा एफआयआर दाखल केल्याप्रकरणी आज सोमय्या खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना सोमय्यांनी या प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. शिवसेनेचा उल्लेख ‘माफिया सेना’ तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘माफिया सेनेचे सरदार’ असा करत सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत खोटा एफआयआर दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे प्रेम आपल्या पाठीशी असल्याचे सोमय्यांनी यावेळी म्हटले.

पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप
यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्‍या नावाने दाखल करण्यात आलेला एफआयआर चुकीचा असून, त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलिस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का, असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी विचारला.

Share