माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचा भोंग्याबाबतचा आदेश रद्द

नाशिक : माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्याबाबत काढलेला मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रद्द केला आहे. भोंग्याबाबतची शहरातील सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भोंग्याबाबत मनसेने दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी १७ एप्रिल रोजी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता.

या आदेशानुसार ३ मेपर्यंत भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागणार होते. मात्र, दीपक पांडेय यांच्या बदलीनंतर येथे रुजू झालेल्या नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अवघ्या पाच दिवसांतच पांडेय यांचा आदेश रद्द केला आहे. नाईकनवरे यांनी नवीन आदेश काढून १७ एप्रिलला पांडेय यांनी जारी केलेले भोंग्याबाबतचे आदेश रद्द केले आहेत. मात्र, भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी म्हटले आहे. नाशिक शहरात स्वतंत्र आदेशाची गरज दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी १७ एप्रिल रोजी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता. सर्व धर्मियांना भोंगे आणि इतर साउंड सिस्टीम वाजवण्यासाठी पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी या आदेशात म्हटले होते. नाशिकमध्ये सर्वच धार्मिक स्थळावर भोंगे लावण्यासाठी ३ मेपर्यंत पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. ३ मेनंतर धार्मिक स्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले होते. अजानच्या वेळी मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी नाही. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालिसा लावायची असल्यास पोलिस आयुक्तांची परवानगी आवश्यक असल्याचे पांडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते.

Share