ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे

मुंबई-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजे मोठ्या आवाजात लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावर आता राज्य सरकारने निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली होती. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवत या काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला होते. दरम्यान राज्य सरकारने अनेक निर्बंध मागे घेतले असून त्यासंबंधीची नियमावली नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.

गृह विभागाने कोरोनाच्या नियमांचं पालन करावे तसेच कमीत कमी गर्दी करुन होळी सण साजरा करावा असं आवाहन केलं आहे. रंग लावणे टाळावे असंही सांगण्यात आले आहे. शिमगा साजरा करताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात नेली जावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन काढून टाकण्यात आलं असून नियमात कोणतेही बदल करण्यात आलेले नसल्याचं स्पष्टीकरणही गृह विभागाने दिलं आहे.
Share