हसन मुश्रीफांचा रामनवमीला जन्म झाल्याचा दावा खोटा : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा जन्म रामनवमीला झाल्याची माहिती खोटी आहे. २४ मार्चला १९५४ ला रामनवमी नव्हती. ११ एप्रिल १९५४ रोजी मुश्रीफांचा जन्म झाला आहे. मुश्रीफांनी जनतेला खोटी माहिती देऊन ४० वर्षे जनतेची फसवणूक केली, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.

राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या पोस्टरवर प्रभू श्रीरामाचा एकेरी उल्लेख केल्याने कागलमध्ये वादंग निर्माण झाले आहे. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन ‘राम’ असा बहुजन समाजाचे नायक प्रभू रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी कागलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. मात्र, मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी कागल पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचा दावा समरजितसिंह घाटगे यांनी केला.

प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा जो प्रकार झाला, तो अत्यंत निंदनीय असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. रामनवमी हा आपला वाढदिवस आहे, हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा संशोधनाचा विषय आहे. मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नव्हे तर रंगपंचमीला झाल्याचे पुरावे घाटगे यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. हे पुरावे घेऊन पोलिस ठाण्यात गेलो असता पोलिसांना चौकशी करण्यासाठी वेळ मागत तक्रार घेण्यास नकार दिल्याचे ते म्हणाले.


हे प्रकरण समरजितसिंह घाटगे यांना महागात पडणार -हसन मुश्रीफ
दरम्यान, हे प्रकरण समरजितसिंह घाटगे यांना महागात पडणार, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मुश्रीफ म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. अडीच वर्षांपासून गायब असणारे आता झटका आल्याप्रमाणे उठले आहेत. ही जाहिरात ‘गोकुळ’च्या संचालकांनी दिली आहे. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. त्यांनी माझ्याप्रेमापोटी ती जाहिरात दिलेली आहे. आम्ही शांत आहोत, अन्यथा घाटगे हे आमच्या पासंगालाही पुरणार नाहीत. गेल्या ५० वर्षांपासून मी राम नवमीला वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हसन मुश्रीफ म्हणजे वडाचे भक्कम झाड असून, कुंडीतल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय वाढत नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार, असा टोला मुश्रीफ यांनी घाटगे यांना लगावला आहे.

Share