महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले

मुंबई : महाराष्ट्रात हिटलरशाही सुरू आहे, विरोधी पक्षांना संपवण्याचा घाट सुरू आहे. भाजप नेत्यांना टार्गेट केले जात आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सर्व काही सुरू आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच भोंग्याच्या प्रश्नावर  राज्य सरकारने आज आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार का टाकला, याचे कारणदेखील सांगितले. गृहमंत्री वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र, या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? मुंबईत जे काही चाललेय ते सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चालले आहे. गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित राहिले नाहीत. मग ही बैठक टाइमपाससाठी होती का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

सरकारने संवादाला जागाच ठेवली नाही
राज्यातील गोंधळावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करून फडणवीस म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण आम्हाला दिले होते. मात्र, राज्यात गेल्या चार-पाच दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहून या सरकारने संवादाला काही जागा ठेवली आहे असे आम्हाला वाटत नाही. कोणी जर हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचे ठरवले असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेलाच बरा, अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत असतील आणि त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकींना जाऊन फायदा काय, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

महाराष्ट्रात अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितील नाही की सरकार पक्षाचे लोक, पोलिस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्यासाठी हल्ला करत आहेत. आम्ही पोलखोल यात्रा काढली, या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळे काय करायचे असते? पण ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला. आमच्या पोलखोल रथावर हल्ला केला आणि त्यांना असे वाटतेय, की अशाप्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणे बंद करू, तर हा गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावा. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.

पोलिसांचा ठाकरे सरकारकडून मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग   
ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पोलिसांच्या समक्ष झेड सुरक्षा असलेल्यावर हल्ला केला जातो. मोहित कंबोज यांच्यावर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर, आणि हे मुंबईतच सुरू आहे असे नाही. राज्यात सर्वदूर भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना लक्ष्य करून, त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहेत. मग कधी प्रवीण दरेकरांवर केस टाकली जाते, उच्च न्यायालयाने दिलासा दिला तर उच्च न्यायालयावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या स्तरावर आता ही नेते मंडळी पोहचली आहे. रणजीतसिंग नाईक-निंबाळकरांविरोधात आठ खोट्या तक्रारी केल्या गेल्या, एकाही तक्रारीत दम नाही. पोलिसांचा दुरुपयोग हा मोठ्या प्रमाणावर चालला आहे आणि हा दुरुपयोगच आहे. कारण यांची एकही केस टिकली नाही, टिकूच शकत नाही. कारण, धादांत खोट्या केसेस टाकणे सुरू आहे, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला.

Share