मुंबईत शेकडो एसटी आंदोलकांची धरपकड

मुंबई : आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर ठिय्या देऊन बसलेल्या एसटी आंदोलकांना आता येथूनही हुसकावण्यात आले आहे. एसटी आंदोलक शनिवारी पहाटे पाचपासून सीएसएमटी स्थानकावर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, रेल्वे पोलिस आणि तिकीट तपासनीसांनी तुमच्याकडे रेल्वे तिकीट नसेल तर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडा, असे सांगत आंदोलकांना तेथून बाहेर काढले. यावेळी पोलिसांनी अडीचशेहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर धडक दिली. या आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पवारांच्या घरासमोर
चप्पलफेक, दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि १०७ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एसटी आंदोलकांच्या सिल्व्हर ओकवरील आक्रमक आंदोलनाप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलीअसून गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कलम १२० ब आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आज शनिवारी पहाटे पोलिसांनी तेथून हुसकावून लावल्यानंतर एसटी आंदोलक जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर ठिय्या देऊन बसले होते. आता रेल्वे पोलिसांनी या आंदोलकांना तेथूनही बाहेर हाकलले आहे.
आंदोलकांनी रेल्वे पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे आंदोलकांना अखेर सीएसएमटी स्थानक सोडावे लागले आहे. सध्या सीएसएमटी स्थानकाबाहेर एसटी आंदोलकांची मोठी गर्दी जमली आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.
आम्ही कोणालाही त्रास देत नाही. आम्ही मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रात राहतो, असे सांगत आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना तेथून हुसकावून लावले आहे. त्यामुळे एसटी आंदोलक पुन्हा संतप्त झाले आहेत. आमच्या मदतीला कोणीही येत नाही. सिल्व्हर ओकवर कोणी काय केले आम्हाला माहिती नाही. आम्ही आझाद मैदानावर शांतपणे आंदोलन करत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत इथून हटणार नाही, असा निर्धार एसटी आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Share