महाराष्ट्रात असे वातावरण कधीच पाहिले नव्हते : शरद पवार

पुणे : एखाद्या धर्मासंबंधी किंवा विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. त्या भावना आणि विचार आपल्या अंत:करणात आणि घरातच ठेवायच्या असतात. प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन नको. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच पाहिले नव्हते. धर्मांमध्‍ये तेढ निर्माण केली जात आहे. मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर होणारी टीका अशोभनीय आहे, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्‍यक्‍त केले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षावरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करावी’ पण एकेरी नाव घेऊन टीका करणे योग्य नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे’ पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात. आणि तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करू शकता’ पण माझ्या दारात येऊन करतो, म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहेत; पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल, असे शरद पवारांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातही मतभेद होते; पण…
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात व्यक्तिगत पातळीवर टीका होत असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, मी इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातही जाहीर मतभेद होते. आम्ही एकमेकांविरुद्ध शब्द वापरताना कधीही काटकसर केली नाही; परंतु बैठक संपल्यांतर ते माझ्या घरी किंवा मी त्यांच्या घरी जायचो. अनेकदा औरंगाबादला सभा झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. सभा संपल्यानंतर आमची संध्याकाळ ज्येष्ठ नेते बापू काळदाते आणि अनिल भालेराव यांच्यासोबत जायची. तेव्हा आपण सभेत काय बोललो, याचे स्मरणही होत नसे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विधिमंडळात एस.एम.जोशी आणि आचार्य अत्रे विरोधी पक्षांचे नेते होते. तेव्हा सभागृहात टोकाची चर्चा होत असे; पण ही चर्चा झाल्यानंतर हे सगळे नेते एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यायचे, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात
भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारले असता पवार म्हणाले, सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझे सरकार बरखास्त केले. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन-चार मित्रांना बोलावलं आणि घरातले सामान आवरले. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्या दिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही; पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत; पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच ‘मी येणार, मी येणार’ अशा घोषणा त्यांनी केल्या; पण ते घडू शकले नाही याची अस्वस्थता असते; पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात, असे पवार म्हणाले.

 


ते म्हणाले, अस्वस्थ असलेले लोक कोणते मार्ग खुले आहेत या खोलात जाणार आणि त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवट लावण्याच्या चर्चा केल्या जातात, दमदाटी केली जाते; पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुका लागल्या तर निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितले आहे. त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असे वाटत नाही. भोंग्यासंदर्भात राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली ही चांगली गोष्ट आहे. सगळ्यांशी बोलायची पद्धत होती. त्यातून काही चांगले निघाले तर आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले.

Share