आई राजा उदो उदो…! तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

तुळजापूर : चैत्र पौर्णिमा सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूरमध्ये मोठी गर्दी केली आहे. दोन वर्षांनंतर चैत्री वारीचा खेटा पूर्ण करता आल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त तुळजापुरात दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा नवरात्रीनंतर सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या चैत्र पौर्णिमा उत्सवाला शुक्रवारी रात्री छबिना मिरवणुकीने सुरुवात झाली. चार दिवसांच्या सलग सुट्यांमुळे तुळजापुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने तुळजापूर नगरी गजबजली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने भाविकांना चैत्र पौर्णिमा उत्सवाला मुकावे लागले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. यावर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र पोर्णिमा सोहळा संपन्न होत आहे. यंदा राज्यातील शेकडो पालख्या वाजतगाजत ‘आई राजा उदो उदो’, ‘सदानंदीचा उदोउदो’, असा गजर करीत चैत्र पौर्णिमेसाठी दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांतून असंख्य भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.

चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे भाविकांनी भवानी तीर्थकुंडात स्नान केले व नंतर थेट मंदिरात जाऊन देवीदर्शन घेऊन पौर्णिमा खेटा पूर्ण केला. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता चरणतीर्थ होऊन धर्म दर्शनास प्रारंभ झाला. सकाळी सहा वाजता घाट होऊन देवीला दुग्धाभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रालंकार घालण्यात आले. नंतर धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.

दुपारी एक ते चारच्या दरम्यान तुळजाभवानी देवीला उष्णतेपासून सुटका मिळवी म्हणून पंख्याने वारा घालण्याचा विधी पार पडणार आहे. संध्याकाळी सात वाजता देवीला पुनश्च दुग्धाभिषेक करण्यात आल्यानंतर वस्त्रालंकार घालण्यात येतील. कपाळी मळवट, देवीची माळ, कवड्यांचा माळा घालून व हातात परडी घेऊन हजारो आराधी, भाविकांनी देवीदर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी बाजारपेठेत देवीचे फोटो, मूर्ती, मुरमुरे, बत्ताशे आदी प्रसाद साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. भाविकांच्या गर्दीमुळे मोफत दर्शन रांग महाद्वारातून बंद करण्यात आली असून, सोलापूर रोडवरील घाटशीळ मार्गावरून भाविकांना मंदिरात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share