सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून, या दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईत ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सोमवारी सुनावणी पार पडली;पण न्यायालयाने काल संध्याकाळी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता, तर नील सोमय्यांच्या अर्जावर आज निकाल देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज न्यायालयाने किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचादेखील जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्या उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर सेव्ह विक्रांतच्या नावाने लोकांकडून गोळा केलेला मदतनिधी योग्य कामासाठी न वापरता या निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. हा निधी योग्य ठिकाणी वापरला जाणं ही सोमय्या पिता-पुत्रांची जबाबदारी होती आणि तेच यासाठी जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलिस आणि राज्य सरकारला तपास करायचा असेल तर ते करु शकतात आणि ताबाही मागू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना आता मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?
आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यवर अनके खळबळजनक आरोप केले होते. तसेच या प्रकरणात माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. भोसले यांच्या तक्रारीनुसार, २०१३-१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतरांनी पुढाकार घेऊन आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी नागरिकांकडून निधी जमा करण्याचे अभियान सुरू केले होते. विक्रांत या युद्धनौकेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतची डागडुजी होत आहे, हे समजल्यावर माजी सैनिक भोसले यांची त्यासाठी वर्गणी देण्याची इच्छा झाली.
सन २०१३ मध्ये चर्चगेट येथे किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे कार्यकर्ते विक्रांत वाचवा असा संदेश छापलेले टी शर्ट परिधान करून युद्धनौका विक्रांत संग्रहालय असे लिहिलेल्या पेट्यांमधून चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर निधी गोळा करत होते. भोसले यांनी त्यावेळी दोन हजार रुपये पेटीत जमा केले. पुढे विक्रांतचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकणार असल्याचे त्यांना समजले. जानेवारी २०१४ मध्ये विक्रांत युद्धनौकेचे सर्व भाग वेगळे करून ते भंगारात विकण्यात आले. सर्व भाग अंदाजे ६० कोटी रुपयांना विकण्यात आले, तसेच ते सर्व भाग आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ऑनलाइन लिलावाद्वारे विकत घेतल्याची माहिती भोसले यांना वर्तमानपत्राद्वारे समजली.
दरम्यान, धीरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून, किरीट सोमय्या यांनी २०१३-१४ मध्ये विक्रांत या युद्धनौकेच्या डागडुजीसाठी नागरिकांकडून जमा केलेला निधी राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये धनादेश अथवा रोख स्वरूपात जमा करण्यात आला का, याबद्दल माहिती विचारली. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा झालेली नाही, तसेच त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर राज्यपाल कार्यालयातून उपाध्याय यांना देण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार भोसले ट्रॉम्बे पोलिसांकडे तक्रार केली आहे. अंदाजे ५७ कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त रक्कम सोमय्या यांनी निधी म्हणून जमा केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले व इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी सायंकाळी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्या व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share