‘एनआयए’ च्या अतिरिक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची प्रतिनियुक्तीवर ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

अतुलचंद्र कुलकर्णी हे महाराष्ट्राच्या कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज ‘एनआयए’ च्या अतिरिक्त महासंचालकपदी कुलकर्णी यांची नियुक्ती केल्याचा आदेश जारी केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला कुलकर्णी यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. देश पातळीवरील दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्याचे आणि तपास करण्याचे काम या राष्ट्रीय तपास संस्थेकडे आहे. कुलकर्णी यांनी सात वर्षे ‘आयबी’ मध्ये काम केले आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतात त्यांची ‘आयबी’त सेवा झाली आहे. त्याचाही त्यांना आता ‘एनआयए’ मध्ये काम करताना उपयोग होणार आहे.

अतुलचंद्र कुलकर्णी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून, १९९० च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस दलात नांदेड येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून जळगाव आणि भंडारा येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. मराठवाड्यात लातूर येथेही त्यांनी काही काळ काम केले आहे. नागपूर येथे नक्षलविरोधी मोहिमेतही त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबईमध्ये सह पोलिस आयुक्त या पदावर काम केले आहे. येरवडा तुरुंगाचे अप्पर पोलिस महासंचालक असताना त्यांनी कैद्यांसाठी विविध उपक्रम सुरू केले होते.

Share