केतकी चितळेला अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक; ५ दिवस पोलिस कोठडी

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यानुसार केतकीला अटक झाली असून, ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी कविता फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी गेल्या शनिवारी कलंबोळी येथून अटक केली होती. ठाणे, मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. केतकी विरोधात यापूर्वी रबाळे पोलिस ठाण्यात बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामुळे रबा‌ळे पोलिसांनी गुरुवारी केतकीला ताब्यात घेतले.

केतकी चितळेने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने नवबौद्धांवरची तिची मते मांडली होती. अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.

 

शुक्रवारी केतकीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलिस कोठडी देण्याची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले, तर या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी केतकीला २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याच्या प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने तिच्या मोबाईलमधील एसएमएस डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि एसएमएसच्या माध्यमातून सक्रिय असल्याचे पोलिसात तपासात स्पष्ट झाले आहे.

Share