मुंबई : देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मध्ये वाढ होताना दिसत असून, जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर सरकारकडून लक्ष ठेवण्यात येत असून, सध्या तरी राज्यात मास्क वापरण्याची सक्ती करणार नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना महासाथीवरही चर्चा करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, राज्यभरात मास्कसक्ती जरी लागू नसली, दंड जरी नसला तरी आम्ही रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांनी मास्कचा वापर केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जवळपास १९ जिल्ह्यात ह्रदयाच्या उपचारासाठी निधी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यातील ४ जिल्ह्यात कॅन्सर आणि ह्रदयाच्या उपचारासाठी सरकारने २५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झाली. नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.