अटल निवृत्तीवेतन योजनेत ४ कोटींहून अधिक सदस्य नोंदणी

नवी दिल्ली : अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मार्च २०२२ पर्यंत ४.०१ कोटीहून अधिक सदस्यांची नोंदणी झाली आहे. चालू आर्थिक वर्षात ९९ लाखांहून अधिक खाती नोंदवण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

एकूण नोंदणी पैकी ७१ टक्के नोंदणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे, १९ टक्के प्रादेशिक ग्रामीण बँकांद्वारे, ६ टक्के खासगी क्षेत्रातील बँकांद्वारे, ३ टक्के पेमेंट आणि लघु वित्त बँकांमध्ये करण्यात आले आहे. अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण नोंदणीपैकी जवळपास ८० टक्के सदस्यांनी १००० रुपयांची आणि १३ टक्के सदस्यांनी ५००० रुपयांची निवृत्तीवेतन योजना निवडली आहे. योजनेच्या एकूण सदस्यांपैकी ४४ टक्के महिला सदस्य आहेत, तर ५६ टक्के पुरुष सदस्य आहेत. योजनेच्या एकूण सदस्यांपैकी ४५ टक्के हे १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत, हे विशेष.

निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे प्रशासित केंद्र सरकारची ही योजना आहे. या योजनेनुसार १८ ते ४० वर्षे वयोगटातील कुठल्याही भारतीय नागरिकाला बचत बँक खाते असलेल्या बँक किंवा टपाल कार्यालयाच्या शाखांमधून सामील होता येते. या योजनेअंतर्गत सदस्याला त्याच्या योगदानानुसार ६० वर्षांच्या वयापासून दरमहा १००० ते ५००० रुपयांपर्यंत किमान हमी निवृत्तीवेतन मिळेल. सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला आणि सदस्य आणि त्याचा जोडीदार या दोघांच्या मृत्यूनंतर ग्राहकाच्या वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत जमा झालेली निवृत्तीवेतन संपत्ती नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल.

Share