ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

बीड : धारूर येथील बस आगाराच्या समोर सकाळी केजहून माजलगावला जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून आठ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (२२ एप्रिल) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शिवराज लक्ष्मण सुरवसे असे मृत बालकाचे नाव आहे.

धारूर येथील बस आगाराच्या बाजूला लक्ष्मण सुरवसे यांचा जनावरांचा गोठा आहे. त्या गोठ्यात त्यांची जनावरे बांधले जातात. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण सुरवसे यांचा मुलगा शिवराज व त्याची आजी दूध आणण्यासाठी गेले होते. दूध काढून घराकडे परतत असताना केज येथून माजलगावला भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टर (क्र.एमएच ४४/डी १९०८) च्या टायरखाली शिवराज आल्याने त्याचा जागीच चेंगरून मृत्यू झाला. या घटनेनंतर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ट्रॅक्टर उचलून मृत शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पुढील कारवाई केली.

अरुंद रस्त्यामुळे हा भीषण अपघात घडला. वेळोवेळी निवेदन देऊन रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. अरुंद रस्त्यामुळे आणखीन कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी जाणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Share