तुरुंगात नवज्योतसिंग सिद्धूंची प्रकृती खालावली; तपासणीसाठी रुग्णालयात दाखल

चंदीगड : पंजाब प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू सध्या पतियाळा तुरुंगात आहेत. ३३ वर्षे जुन्या ‘रोड रेज’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना दोषी ठरवत एक वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू यांची तुरुंगात रवानगी केल्यानंतर त्यांनी तुरुंगातील जेवण घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सिद्धू यांची तब्येत बिघडली असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पतियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे.

१९८८ च्या ‘रोड रेज’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पार्किंगवरून झालेल्या वादात सिंद्धूंनी एका ६५ वर्षीय व्यक्तीला मारहाण केली होती. यामध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सिद्धू यांचे वय सुमारे २५ वर्षे होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सिद्धू यांना केवळ एक हजार रुपयांचा दंड ठोठावून मुक्त केले होते. याविरोधात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आणि सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी संध्याकाळी सिद्धू यांनी पतियाळा न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर त्यांची रवानगी पतियाळा तुरुंगात करण्यात आली.

सिद्धूंकडून विशेष आहाराची मागणी

नवज्योतसिंग सिद्धू यांना गव्हाची ऍलर्जी आहे. त्यांना यकृताचा त्रास आहे. हे पाहता सिद्धूंनी तुरुंग प्रशासनाकडे विशेष आहाराची मागणी केली आहे. त्यानंतर तुरुंग प्रशासनाकडून त्यांना उकडलेल्या भाज्या आणि कोशिंबीर देण्यात येत होते. आज सिद्धूंनी आपल्या प्रकृतीबाबत तुरुंग प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिद्धूंचा त्रास पाहता तुरुंगात एक वैद्यकीय मंडळ तयार करण्यात आले आहे, जे लवकरच सिद्धूंच्या आहाराबाबत निर्णय घेईल.

तुरुंगातील सुरक्षेवरून गोंधळ
‘रोड रेज’ प्रकरणात सिद्धू यांच्यासोबत आरोपी असलेल्या रुपिंदर सिंग संधूने रविवारी कारागृहातील सुरक्षेबाबत प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. सिद्धू हे आगामी काळात पंजाबचे भविष्य असल्याचे ते म्हणाले. कारागृहात प्रोटोकॉल पाळला जात आहे की नाही, याची तपासणी व्हायला हवी. काँग्रेस नेते हरदयाल कंबोज म्हणाले की, सिद्धू तुरुंगात गेल्यानंतर ज्यांनी त्यांची भेट घेतली त्या सर्व लोकांची चौकशी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. दरम्यान, सिद्धू यांच्या सुरक्षेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तुरुंग अधिकारी मनजीत तिवाना म्हणाले की, कैद्यांना सुरक्षित ठेवताना सर्व नियमांचे पालन केले जात आहे. सिद्धू यांच्या बॅरेकमध्ये कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेश देण्यात आलेला नाही.

Share