नवाब मलिकांची प्रकृती खालावली; स्ट्रेचरवरून जे. जे. रुग्णालयात केले दाखल

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असून, आज सोमवारी त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तुरुंगात असल्यामुळे नवाब मलिक यांची प्रकृती प्रचंड खालावल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक यांना सोमवारी स्ट्रेचरवर झोपवून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून ते खूप आजारी आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांच्या वकिलांनी पीएमएलए न्यायालयात दिली. त्यामुळे नवाब मलिक यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अंतरिम वैद्यकीय जामीन द्यावा, अशी विनंती करण्यात आली. मात्र, मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यास सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे. मलिक यांना रुग्णालयात उपचार घेऊन देण्यास आम्ही तयार आहोत, असे ‘ईडी’कडून विशेष न्यायालयात सांगण्यात आले. आता न्यायालयाकडून ५ मे रोजी मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

नवाब मलिकांवर आरोप काय?
गेल्या २३ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’च्या पथकाने नवाब मलिक यांची दीर्घकाळ चौकशी केली होती. त्या चौकशीअंती ‘ईडी’कडून मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधी गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मुंबईतील पाचपैकी एक फ्लॅट हा मुनीरा प्लंबर यांच्या नावे आहे. नवाब मलिक यांनी मुनीरा प्लंबर यांना मेसर्स सोलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर औपचारिक नियुक्ती दिली;पण वास्तवात ही कंपनी मलिक यांचे कुटुंबीय हे दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या सामंजस्याने चालवत होते, असे तपासात समोर आले आहे.

https://twitter.com/ANI/status/1519585559437451264?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519585559437451264%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fmumbai%2F174756%2Fnawab-malik-was-taken-to-jj-hospital-on-a-stretcher-after-his-health-deteriorated%2Far

‘ईडी’कडून मलिकांच्या ८ मालमत्ता जप्त
नवाब मलिक यांच्या ८ मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त करण्यात आल्या आहेत. यात मलिकांची उस्मानाबाद येथील १४७ एकर शेतजमीन, वांद्रे पश्चिममधील दोन फ्लॅट्स, कुर्ला पश्चिममधील ३ फ्लॅट्स, कुर्ला पश्चिममधील कमर्शियल युनिट आणि गोवावाला कपाउंडमधील मालमत्तेचा समावेश आहे. मेसर्स सोडियस इन्वेस्टमेंट प्रा. लि. आणि मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर या मलिकांच्या मालमत्तांवरदेखील ‘ईडी’ने टाच आणली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ‘ईडी’ने केलेल्या अटकेला आव्हान देणारी नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा फेटाळून लावली आहे. ही केस प्रारंभिक टप्प्यावर असून त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मलिक यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. ‘ईडी’ने मलिक यांना कायद्यानुसार अटक केली असून नियमानुसार त्यांची कोठडी घेतली आहे. अशा स्थितीत त्यांना तत्काळ जामीन देता येणार नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Share