राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने आजही कोणताही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निकाल मुंबई सत्र न्यायालयाने आजही राखून ठेवला असून, बुधवारी ४ मे रोजी सकाळी त्यांच्या जामिनावर निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला बुधवारपर्यंत जेलमध्येच राहावे लागणार आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी ते अमरावती येथून मुंबईत दाखल झाले होते. राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच दोन दिवस शिवसैनिकांनी ‘मातोश्री’ बाहेरही ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असल्याने आपण ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले होते; पण त्यानंतर खार पोलिसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे, त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक केली.

पोलिस कोठडीनंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सध्या खा. नवनीत राणा भायखळा कारागृहात, तर आ. रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर १२४ अ आणि ३५३ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, शनिवारी (३० एप्रिल) राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. राणा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडून खटल्यावर प्रभाव टाकू शकते. राणा दाम्पत्याचा उद्देश केवळ हनुमान चालिसा वाचणे हा नव्हता. राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसा प्रकरणाद्वारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान देण्याचा हेतू होता. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा डाव राणा दाम्पत्याने रचला होता, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी करत राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. दुसरीकडे राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद करताना, राणा दाम्पत्य हे जबाबदार नागरिक असून ते प्रत्येक अटी पाळतील, असे सांगत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या आरोपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी सोमवार (२ मे) पर्यंत निर्णय राखून ठेवला होता. आता बुधवारी सकाळी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर निर्णय दिला जाईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

Share