राष्ट्रवादी म्हणजे आयत्या बिळातील नागोबा : खा. प्रीतम मुंडे

बीड : आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या. बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचे काम करत आहे, अशी टीका भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे. आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादीच्या लोकांनी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच खा. प्रीतम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकासकामाचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे खडे बोल सुनावले आहेत. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना ही सर्व कामे मंजूर झाली आहेत. त्यामुळे कोणी कितीही नारळ फोडू द्या, जनता हुशार आहे, असा टोला खा. प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.

 

खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते आज गेवराई तालुक्यातील १४ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर कडाडून टीका केली. खा. मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची ‘नार्को टेस्ट’ करा आणि त्यांना विचारा की, गेल्या आठ वर्षात प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदारकडून कामाच्या बदल्यात काही पैसे घेतले आहेत का? मी कुणाचा चहादेखील घेतला नाही. मी प्रामाणिकपणाने तुमचे काम करण्याचा प्रयत्न करत असून, तुमचे प्रश्न सरकार दरबारी मांडत आहे. या कार्यक्रमात शासकीय अधिकारी मंचावर न बसता सभामंडपाच्या बाजूला बसले होते. खा. प्रीतम मुंडे यांनी व्यासपीठावर न बसता खाली बसलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही समाचार घेतला. अधिकार्‍यांवर स्थानिक प्रशासनाचा दबाव आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

Share