शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात तक्रार; ‘व्हीप’ विरोधात मतदान केल्याचा आरोप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘व्हीप’ विरोधात मतदान करणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील १६ आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचे अधिवेशनादरम्यान वाचन केले. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जाहीर होताच शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना ‘व्हीप’ जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे, असा आदेश आमदारांना या ‘व्हीप’ द्वारे देण्यात आला होता. ‘व्हीप’ जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाले होते. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला ‘व्हीप’ आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडूनही शिवसेनेच्या आमदारांना ‘व्हीप’ जारी करण्यात आला होता.

शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांनी आमचा ‘व्हीप’ झुगारून शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली हे महाराष्ट्राची १३ कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल, असे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू म्हणाले.

नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना सुनील प्रभू म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्षपदी तरुण सदस्याची निवड झाली याचा आनंद वाटत आहे. आपण कधीकाळी शिवसेनेत होता, नंतर राष्ट्रवादीत गेला. त्यानंतर भाजपमध्ये गेला. मागील १५ दिवसांमध्ये सत्तांतराच्या वातावरणात राहुल नार्वेकर कायदामंत्री होतील, असे वाटले होते; पण नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री पाहत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ज्यांना कायदामंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हावे लागले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असतील असे वाटले होते. मात्र, आमचे दु:ख विसरून देवेंद्र फडणवीस यांचे दु:ख मित्र म्हणून मोठे वाटले, असेही प्रभू यांनी म्हटले.

विधानसभेच्या अध्यक्षाबाबत महाराष्ट्रातील जनतेला, विधानसभा सदस्यांना आदर वाटत आहे. मात्र, आजच्या मतदानात आमचा ‘व्हीप’ झुगारून ३९ आमदारांनी मतदान केले ही खंत वाटत आहे. राज्यातील १३ कोटी लोकांना याची खंत वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आपण विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील १३ कोटी जनतेला शंका असल्याचेही प्रभू यांनी म्हटले.

Share