पवार कुटुंबीयांनी २३ कारखाने घशात घातले : राजू शेट्टी

कोल्हापूर : साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार. सगळ्यात जास्त कारखाने यांच्याच ताब्यात. शरद पवार कुटुंबीयांनी २३ साखर कारखाने घशात घातले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मतांची शेती करतो. कन्‍नड साखर कारखाना घशात घालून तो अतिकष्टाळू झाला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. त्याचा पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री हेच असत. मात्र, शरद पवार एकदा अध्यक्ष झाले आणि कायमचेच अध्यक्ष राहिले. वसंतदादा पाटील यांनी डेक्कन साखर संकुल उभारले आणि त्याचेही तहयात अध्यक्ष शरद पवार बनले. शरद पवार यांच्या कुटुंबातील अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी तब्बल २३ साखर कारखाने आपल्या घशात घातल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

दिवसा शेतीसाठी वीज मिळावी ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी मी न्यायालयात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि वाढत्या महागाईने शेतकरी भरडला जात आहे. तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे, तर शिल्लक साखरेवर नाबार्डकडून थेट कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न केलात तर शेतकरी सुखी होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी व दिवसा वीजपुरवठा करावा, यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असेही ते म्हणाले. जि.प. आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक म्हणाले, भाजप, महाविकास आघाडीने आम्हाला फसविले. सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी यांना कोळसा संपलेला समजत नाही. झोपा काढता काय? निवडणुकीत पराभूत झालो, याचे दुःख नाही. सत्तेत असताना आम्ही पैसे मिळवले नाहीत. शेतकर्‍यांचे पाठबळ मिळवले. त्यामुळेच आमच्या मागे ‘ईडी’ लागली नाही, असा टोला त्यांनी हाणला.

Share