भोंग्यांबाबत पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्त धोरण ठरवणार

 

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर (भोंगे) वाजवण्यासंदर्भात पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांनी एकत्र बसून धोरण ठरवावे, असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पत्रकारांशी बोलत होते. भोंग्यांसदर्भात पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त यांनी एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश दिले आहेत. कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.

भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे भलतेच आक्रमक झाले असून, येत्या ३ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने भोंग्यांबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील नव्या गाईडलाइन्स लवकरच जाहीर करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1515937104450457600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515937104450457600%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Flatest%2F161671%2Fstrict-action-will-be-taken-against-those-who-create-racial-rift-dilip-walse-patil%2Far

Share