पंतप्रधान नरेंद्र मोदींना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर यावर्षीपासून सुरू झालेल्या पहिल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगेशकर कुटुंबातर्फे लतादीदींच्या भगिनी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर आणि लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

 

या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे तर चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ तर संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व निर्माते श्रीपाद पद्माकर तसेच सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नूतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे येत्या २४ एप्रिल रोजी होणाऱ्या एका विशेष समारंभात लतादीदींच्या भगिनी उषा मंगेशकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

 

भारताची गानकोकिळा अशी जगभर ओळख असलेल्या आणि आपल्या जादुई स्वराने रसिकांवर मोहिनी घातलेल्या लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. दरवर्षी देशहित आणि समाजहितासाठी तसेच मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती असलेले काम आणि सेवा पाहून यावर्षी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास संमती दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकर यांनी यावेळी दिली.

 

या पुरस्काराविषयी बोलताना लतादीदींचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. लतादीदींच्या ओळखीचा आणि दीदींच्या नावाला शोभेल असा पुरस्कारार्थी असायला हवा. १५ वर्षांपूर्वी आम्ही दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने पुण्यात नवीन रुग्णालय बांधले होते तेव्हा नरेंद्र मोदी यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी हे लतादीदींना बहीण मानत असत. त्यावेळी केलेल्या भाषणात लतादीदींनी, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती आणि काही दिवसांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले, अशी आठवण ह्रदयनाथ मंगेशकर यांनी याप्रसंगी सांगितली.

Share